
सीए इन्स्टिट्यूटमार्फत नवउद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मार्गदर्शन करूया-उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : कितीही मोठे प्रकल्प आले तरी त्याचा पाया एमएसएमई आहे. त्यामुळे या उद्योजकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व बॅंकांना एकत्र बोलावू. सीए इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा. या उद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्टपासून सर्व ते मार्गदर्शन करूया. सीएंची ताकद ही समाज परिवर्तनाची आहे. इन्स्टिट्यूट एमएसएमईसाठी योगदान देत असल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले.सीए इन्स्टिटयूटच्या एमएसएमई आणि स्टार्ट अप कमिटीच्या वतीने रत्नागिरी सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेने हॉटेल विवा येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी मंत्री बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सागर नाईक, सीए शाखाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, खजिनदार सीए केदार करंबेळकर उपस्थित होते.या वेळी मंत्री सामंत म्हणाले की, मोठ्या उद्योजकांना रेड कार्पेट देतो पण महाराष्ट्रात एमएसएमईना रेड कार्पेट मिळण्यासाठी म्हणून राज्यात गेल्या वर्षापासून उद्योग परिषद सुरू केली. याचा परिणाम चांगला झाला व ९६ हजार कोटींचे उद्योग स्थानिकांनी सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी आहे. यात साहित्य, उपकरणे, प्रशिक्षण दिले जाते. एक लाखापासून कर्ज दिले जाते. तीन वर्षानंतर याच उद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत घेऊन त्याला ५० लाख रुपये देतो. महाराष्ट्रात ही योजना प्रभावी पद्धतीने राबवली जात आहे. रत्नागिरीत संरक्षण खात्यातील प्रकल्पामुळे त्या हत्यारांवर मेड इन रत्नागिरी असे छापून येणार आहे. उद्योगपती अंबानी डिफेन्स क्लस्टरमध्ये दहा टक्के लोक बाहेरचे असतील व ९० टक्के इथले असतील, असे सांगितले आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.सीए अभिलाषा मुळ्ये म्हणाल्या की, सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा प्रदान करून अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे सीए हे देशाचे आधारस्तंभ असतात. याच विचाराने एमएसएमई सक्षमीकरण हा उद्देश ठेवून सर्व शाखांमर्फत असा कार्यक्रम राबविला आहे. संपूर्ण देशात झालेली एमएसएमई रथयात्रा आज रत्नागिरीत आली.बॅंकेचे झोनल मॅनेजर सागर नाईक म्हणाले की, छोट्या उद्योजकांना उभारी द्यायची आहे. लहान व्यावसायिकांकडून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ४७ शाखांच्या माध्यमातून सरकारच्या विविध कर्जयोजना राबवत आहोत. राज्य सरकारने गेल्या वर्षी मुख्यमंत्री रोजगार हमी योजना राबवण्यात बॅंकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे उद्योजकांना लागणारे सर्व सहकार्य बॅंक करेल, अशी ग्वाही दिली.या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक संकेत कदम आणि महाराष्ट्र कौशल्य विकास योजनेच्या प्रोबेशनरी ऑफिसर सुप्रिया ननावरे, सीए आनंद पंडित यांनी मार्गदर्शन केले. सचिव सीए केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर, माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, सीए एच. एल. पटवर्धन, सीए भूषण मुळ्ये, सीए बिपीन शाह, सीए श्रीरंग वैद्य, सीए श्रीकांत वैद्य, सीए मंदार गाडगीळ, सीए अभिजित चव्हाण, सीए अभिजित पटवर्धन यांच्यासह रत्नागिरीतील सीए, करसल्लागार, नवउद्योजक, विविध व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.