
टिळक आळी गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम टिळक आळी गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांना दसर्यापासून सुरुवात
रत्नागिरी : रत्नागिरीतील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे पुढचे वर्ष हे १०० वे अर्थात शतक महोत्सवी वर्ष असणार आहे. यानिमित्ताने टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. हे शतक महोत्सवी वर्ष या दसर्यापासून म्हणजेच शनिवार दि.१२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान (पार) येथे दर शनिवारी भजन होते. याची सुरुवात १९१८ साली दसर्याला झाली होती. त्याला आता १०५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्या दिवसाचे औचित्य साधून शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ पासून हे शतकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मंडळाने अथर्वशीर्षाच्या लक्ष आवर्तनाचा संकल्प सोडला आहे. रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी या लक्ष आवर्तनाला सुरुवात होणार आहे. रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ४ ते ६ अशी ही आवर्तने होणार आहेत. तसेच रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.०० वा. टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्ते व सदस्यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सौ. प्रतिभा प्रभुदेसाई अथर्वशीर्ष या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत केळ्ये- मजगाव येथील श्री. उदय मेस्त्री (श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळये-मजगाव) यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संपूर्ण वर्षात टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबविले जाणार असून बुद्धिबळ, कॅरम, ब्रीज अशा विविध स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.