
सोशल मीडियावरून दहा लाखांचे लोन देतो, अशी जाहिरात करत दापोली येथील एकाची फसवणूक.
सोशल मीडियावरून दहा लाखांचे लोन देतो, अशी जाहिरात करत दापोली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला चौघांनी १ लाख ७२ हजार ५५४ रुपयांना गंडवले. याप्रकरणी पूर्ण नाव माहिती नसलेल्या चौघा जणांविरुद्ध दापोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोली येथील उदयनगर येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी सुधीर नरहरी होनवले (५९) या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने चौघांविरुद्ध ही तक्रार दिली आहे. त्यानुसार २९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता सुमारास व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांना विकास बर्मन, चेतन धुरी, संजीव कुमार आणि अश्विन कुमार या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सुधीर होनवले यांना दहा लाख रुपये लोन देतो असं सांगितलं. यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, जीएसटीसाठी पैसे भरावे लागतील असं सांगून होनवले यांच्याकडून व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून १ लाख ७२ हजार ५५४ रुपये हडप केले आणि त्यांची फसवणूक केली.