
माहिती अधिकार अर्जावर सकारात्मक आणि गांर्भीर्यपणे कार्यवाही करावी वरिष्ठ अधिव्याख्याता राहूल बर्वे.
रत्नागिरी : माहिती अधिकाराच्या प्राप्त झालेल्या अर्जावर सकारात्मक पाहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गांर्भीर्याने कार्यवाही करुन आलेला अर्ज वेळेत निर्गत करा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता राहूल बर्वे यांनी केले. 28 सप्टेंबर हा दिवस राज्यपातळीवर माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो. उद्या शासकीय सुट्टी असल्याने माहिती अधिकार दिन आज साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे उपस्थित होत्या. श्री. बर्वे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, अर्ज निकाली काढण्याचा अधिकारी आयुक्तांना आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांना तो नाही. या कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेले शासन निर्णय सर्वांनी पहावेत. त्यानुसार काय करायला नको यावर भर द्यायला हवा. जुनी माहिती मागण्यासंदर्भात आलेल्या अर्जावर अर्ज दाखल झालेल्या तारखेपासून २० वर्ष होतील एवढी आधीची माहिती देता येईल. त्रयस्थ पक्षातील माहिती देण्यासाठी अतिरिक्त 10 दिवस मिळतात. एका वेळेला एका अर्जातून एकाच प्रकारची माहिती द्यावी. पहिल्या क्रमांकाची माहिती यामध्ये देणे आवश्यक आहे. अर्जात प्रश्नार्थक माहिती असेल तर या प्रश्नांने उत्तर देणे कलम २(च) नुसार माहिती देणे बंधनकारक नाही. 2019 च्या शासन निर्णयानुसार प्रथम अपिलिय अधिकाऱ्यांनाही शास्ती करण्याचे अधिकार आहेत. 1850 प्रकरणात शास्ती झालेली आहे. प्रत्येक दिवसाला 250 असे 25 हजार होईपर्यंत शास्तीची तरतूद आहे. माहिती अधिकार कायद्याचा काही प्रवृत्ती गैरप्रकार करत असल्यामुळे या कायद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतोय, असे सांगून श्री. बर्वे म्हणाले, कायद्यातील तरतूदी पाहून सकारात्मक दृष्टीकोणातून अर्जावर कार्यवाही करावी आणि असे अर्ज निर्गत करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, शासनाने वेळोवेळी प्रकाशित केलेले शासन निर्णय त्यामधील तरतूदी आणि सकारात्मक उद्देश ठेवून अशा अर्जांचे वेळेत निराकरण होईल, हे पहावे. कायद्यामध्ये डोकावल्यास प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळेल, हीच सकारात्मक बांधिलकी प्रशासनात असावी, असेही ते म्हणाले. तहसिलदार श्री. गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महसूल तसेच अन्य विभागातील विविध शाखातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.000