वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट पलटी होऊन या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू.
वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट पलटी होऊन या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १.४५ वा.च्या सुमारास घडली. आनंद पुंडलिक पराडकर (५२, रा. कोचरा श्रीरामवाडी) आणि रघुनाथ धर्माजी येरागी (४९, रा. खवणे मधलीवाडी) अशी या दुर्घटनेत बुडून मयत झालेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत निवती पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वा. निवती येथील मच्छीमार अनिता आनंद धुरी यांची ‘धनलक्ष्मी’ ही मच्छीमारी बोट १४ खलाशांना घेऊन समुद्रात आनंद पराडकर रघुनाथ येरागी मच्छीमारसाठी गेली होते. मध्यरात्री निवती समुद्रातून ही बोट परतीचा प्रवास करत असताना ती पलटी झाली. यावेळी मच्छीमारीसाठी वापरली जाणारी गिलनेट जाळी दोघांच्या अंगावर पडल्याने त्यात गुरफटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. किनाऱ्यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्र येते त्या ठिकाणी किनाऱ्यापासून २०० मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने १२ खलाशी पोहून किनाऱ्यावर आले.