चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटना स्थळाची पाहणी; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई, दि. ६:- चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button