
काँग्रेस सत्तेत आल्यावर पहिल्यांदा आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेईल-राहुल गांधी.
‘रा.स्व.संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना राज्यघटना बदलायची आहे कारण त्यांना देशातील ९० टक्के लोकांना मागे ठेवायचे आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असून आम्ही हा कायदा करून घेणारच आहोत.काँग्रेस सत्तेत आल्यावर पहिल्यांदा आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेईल,’ असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केले. सयाजी हॉटेलमध्ये झालेल्या ‘संविधान सन्मान’ संमेलनात ते बोलत होते.यावेळी राहुल गांधी यांचा विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा उपदेश केला. यातील शिक्षणाला फार महत्त्व आहे. यातील शिक्षणाचा अर्थ केवळ शालेय शिक्षण नाही.तर आपल्या अवती भवती जे चालू आहे त्याचे निरीक्षण केले पाहिजे. त्यानंतर आपल्याला संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची आवश्यकता वाटेल. शिक्षण व्यवस्था विशिष्ट शक्तींच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात दलित, आदिवासी यांचा उल्लेख नाही. संघ आणि भाजपला हेच करायचे आहे. राज्यघटनेचे रक्षण करायचे असल्यास आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या पुढे नेले पाहिजे.