
क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून, औषधोपचार सुरू करावेत-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड
*रत्नागिरी दि.24:* क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून, औषधोपचार सुरू करावेत. सर्वांनी आपली काळजी घेऊन क्षयरोगमुक्त देश घडवूया, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी आज येथे केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, डॉ.रश्मी आठल्ये, जयेश काळोखे आदी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालय येथे प्रभातफेरीचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
इंदूराणी जाखड म्हणाल्या की, क्षयरोग (टीबी) या रोगाचे निदान वेळीच होणे आवश्यक आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असेल तर तातडीने टीबीची तपासणी करणे आवश्यक आहे. जनजागृती आणि दक्षता घेऊन देश क्षयरोगमुक्त करु या. यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ.गावडे आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, दि.24 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत जनजागरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून घरोघरी तपासणी करून क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉ.जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पाखरे यांनी केले.
00000