प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती’ – शरद पवार
सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मात्र, ते पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणे अशक्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कायद्यात बदल केला पाहिजे. राज्यातही तातडीने तमिळनाडूप्रमाणे आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत न्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केली. यावेळी त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही महत्त्वाचे विधान केले.*गुरुवारपासून पवार सांगली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांच्या प्रारंभापूर्वी त्यांनी सकाळी आठच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला. वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती तर आम्ही त्याची दखल घेतली असती, असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. ५० टक्क्यांच्या आतून आरक्षण देणे अशक्य आहे. मराठा समाजासह अन्य समाजांना आणखी जादा आरक्षणासाठी केंद्राने कायद्यात बदल करायला हवा. सध्याचे ५० टक्के आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत वाढविता येईल. तमिळनाडूमध्ये तर ७८ टक्के आरक्षण आहे.’पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्रात धडक दौरे-सभा करून महाविकासचा विजय सोपा करीत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. ‘विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी राज्यात वारंवार प्रचाराला यायला हवे. ते असे येत राहिले तर लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात महाविकास आघाडी पुन्हा येईल. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी केव्हाही आचारसंहिता लागू होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे दौरे वाढले आहेत.लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १८ ठिकाणी सभा झाल्या. त्यातील १४ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. याच निकालाची विधानसभेसाठीही पुनरावृत्ती होईल. मोदी, शहा यांनी राज्यात सर्वाधिक सभा घ्याव्यात, त्याचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीच्या विजयासाठी होईल. देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत जाण्यास सांगण्याऐवजी ते दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते फोडून आणा असे सांगत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.ते म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेसाठी निधीला विरोध नाही. मात्र, त्यासाठी शासन पूर्वीच्या जाहीर अनेक योजनांच्या निधीला कात्री लावत आहे. सरकार ठप्प झाले आहे. राज्यातील वैद्यकीय उपचारांचे अनुदान थांबले आहे. केवळ कॅन्सरवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांची सातशे कोटींवर देणी थकली आहेत.’ विधानसभा निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांत चर्चा सुरू झालेल्या आहेत. समन्वय समितीच्या बैठका सुरू आहेत. त्यात मी नाही. प्रदेशाध्यक्षांसह अन्य लोक चर्चा करीत आहेत. मात्र, तातडीने जागा वाटपावर तोडगा निघाल्यास पुढील प्रचारास आणखी गती मिळेल. ७ ते ९ ऑक्टोबरला समन्वय समितीची बैठक होत आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.*’ती’ ऑफर आमची नाही*केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला पंतप्रधानपदासाठी ऑफर मिळाल्याचे सांगितले होते. त्यावर श्री. पवार म्हणाले, ‘केंद्रात विरोधी पक्षाकडे किंवा आमच्याकडे पुरेसे बहुमतच नसल्यामुळे त्यांना ऑफर देण्याचा विषयच येत नाही. गडकरी यांच्या कामाचे कौतुक आहे. ते स्पष्टपणे बोलतात. लाडक्या बहीण योजनेबाबतही ते योग्य आणि नेमके बोलले आहेत.’*पवार म्हणाले…** केंद्र सरकारने उशिरा; पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल अभिनंदन. याचा भाषा वाढीसाठी फायदा होईल.* राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत ते म्हणाले, यामुळे आम्हाला घाम सुटला आहे. काय करायचे ते सुचेना झालंय.* वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती तर आम्ही त्याची दखल घेतली असती.* शक्तिपीठ महामार्गाबाबत लोकभावनेचा आदर करूनच निर्णय.