
नाटे येथील पोलीस कर्मचार्याची ४३ लाखांची कोल्हापूर येथील दांपत्याकडून फसवणूक.
एका महिन्यात चारचाकी देतो सांगून रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याचे वडील आणि सासर्यासह सहकारी मित्राला कोल्हापूर येथील एका दांपत्याने तब्बल ४३ लाख ५३ हजाराला चुना लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नाटे येथे स्थायिक असलेल्या संबंधित पोलीस कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनुसार कोल्हापूर येथील ओमकार राजेंद्र निकम आणि धनश्री ओमकार निकम यांच्या विरोधात नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सुनील भरत गांगुर्डे (२५, रा. नाटे, ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुनिल गांगुर्डे हे रत्नागिरी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असून ते आपल्या कुटुंबासह नाटे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील नाटे विद्यामंदिर येथे नोकरीला असून त्यांना चारचाकी वाहन घ्यायचे होते. मात्र रत्नागिरी येथील शोरूममध्ये या गाडीसाठी एक वर्ष वेटींग असल्याचे सांगण्यात आले.याबाबत सुनील यांनी त्यांच्यासोबत पोलीस दलात सेवेत असलेल्या सिंद्राम लिंगाप्पा कांबळे यांना सांगितले असता कांबळे यांनी आपल्यालाही गाडी घ्यावयाची असून एका ओळखीच्या माणसाकडे पैसे भरून तो ३० दिवसात गाडी देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सुनील हे देखील सदर इसमाकडे पैसे भरून गाडी घेण्यास तयार झाले.दरम्यान सुनील यांनी त्यांचे सासरे यांना ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी देखील गाडी खरेदीची तयारी दर्शविली. त्यानुसार सुनील यांनी ओमकार याला दोन गाड्या बुक करण्यास सांगून ३ ऑगस्ट २०२४ पासून ओमकार निकम व धनश्री निकम यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने गुगल पे व एनईएफटीद्वारे सुमारे १९ लाख ३ हजार रुपये पाठविले. तसेच सुनील यांचे सहकारी मित्र सिद्राम कांबळे यांनी १४ लाख व युवराज सखाराम हुजरे यांनी १० लाख ५० हजार अशी एकूण ४३ लाख ५३ हजार रुपये ओमकार व धनश्री निकम यांच्या खात्यावर भरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान पैसे पाठवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी ओमकार निकम याने गाड्या दिलेल्या नाहीत. त्याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद लागत आहे. www.konkantoday.com