अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? मोठं कारण आलं समोर!
महायुतीमध्ये जागा वाटपाचे घोडे अजूनही अडलेले आहेत. दसऱ्याला महायुतीचे जागा वाटप पूर्ण होवून उमेदवारांची यादीही जाहीर केली जाईल असे सांगितले जात आहे. मात्र पडद्या मागे अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महायुतीत सर्व काही ठिक सुरू आहे असे नाही असेच समजत आहे. अनेक जागांवरून अजूनही तोडगा निघालेला नाही. तिन्ही पक्ष काही जागांवर अडून बसले आहेत. अशा स्थिती अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मागितलेल्या जागा मिळाल्या नाहीत तर वेगळा विचार करण्याचा निर्णयही अजित पवारांनी घेतल्याचे समजत आहे.*अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत जवळपास 80 ते 85 जागा मागितल्या आहेत. सध्या अजित पवारांबरोबर अपक्ष आणि इतर पक्षाचे मिळून जवळपास 50 च्या आसपास आमदार आहेत. त्या जागा तर मिळाल्याच पाहीजेत. शिवाय आणखी 30 ते 35 जागा मिळाव्यात अशी अजित पवारांची मागणी आहे. याबाबत त्यांनी भाजप केंद्रीय नेतृत्वालाही माहिती दिली आहे. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णयही अजित पवार घेवू शकतात अशी माहित पुढे येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत दुय्यम स्थान दिले जात आहे. शिवाय आपल्यालाच लक्ष केले जात आहे अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या पारड्यात हाताच्या बोटावर मोजण्या येवढ्याच जागा आल्या होत्या. त्यातही फक्त एक जागा अजित पवारांना जिंकता आली. लोकसभेला कमी जागांवर अजित पवारांची बोळवण करण्यात आली. पवारांनी तेही मान्य केले. पण विधानसभेला कमी जागा घेवून तडजोड करण्याच्या तयारीत अजित पवार नाहीत.वेळ पडली तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे. भाजप केंद्रीय नेतृत्वालाही त्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात अजित पवारांना हे परवडण्या सारखे आहे का? हा खरा प्रश्न आहे. अजित पवारांची अडचण भाजप बरोबरच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनाही माहित आहे. त्यामुळे पवार आपल्याला सोडून जावू शकत नाहीत अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळेच जास्त जागा अजित पवारांना देण्यात हे दोन्ही मित्र तयार नाहीत अशी सध्याची स्थिती आहे. शिवाय लोकसभेला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले नाही असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेला अजित पवारांचे काम करणार नसल्याचे अनेकांनी जाहीर पणे सांगितले आहे.