सावंतवाडी जंगलात लोखंडी साखळीने बांधल्याचा अवस्थेत सापडलेली ती मनोरुग्ण परदेशी महिला मायदेशी जाण्यासाठी रत्नागिरीतून रवाना झाली.

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सोनुर्ली गावातील कऱ्हाडीचे डोंगर येथे रस्ताही नसलेल्या घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी महिलेला रत्नागिरीतील मनोरूग्णालयातून आपल्या मायदेशी जाण्यासाठी पाठविण्यात आले आहे. आज (३ ऑक्टोबर) सकाळी ती महिला दोन महिला पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई येथे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर रवाना झाली. तिथून ती मुंबई विमानतळावरून पुढील सोपस्कार पार पाडून आपल्या मायदेशी परतणार आहे. ही परदेशी महिला २७ जुलै २०२४ रोजी सावंतवाडीतील जंगलात सापडली होती. सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर जिल्हासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तसेच याची अमेरिकन दुतावासानेही दखल घेतली होती.सुरुवातीला तिने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आपणाला पतीने जबरदस्तीने बांधून जंगलात ठेवले असल्याचे सुरुवातीला सांगितले होते परदेशी महिलेच्या बाबतीत हा विषय असल्याने हे प्रकरण गंभीरपणे हाताळत सावंतवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून या महिलेच्या पतीचा शोध घेतला; मात्र प्रत्यक्षात तिने दिलेली माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले होते मात्र नंतर ती मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याने नैराश्येतून हे कृत्य स्वतः केल्याची माहिती तिने जबाबात दिली आहे. ‘मी स्वतःच आपला जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं. मला मरायचं होतं, माझा भारतातील व्हिसा संपला होता’, अशी कबुली या महिलेने दिल्याने पोलीसही चक्रावले होते. सदरची महिला मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार झाले असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले होते मानसिक आजारपणातून आपण स्वतःला संपवण्यासाठी जंगलात स्वतःला बांधून घेतल्याचा बनाव केला होता. यामुळे या मनोरुग्ण महिलेवर उपचाराची गरज असल्याने तिला पुढील मानसिक उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button