प्रेरणा संस्थेच्या (मुंबई) विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन बालकांच्या हक्कासाठी काम करण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील केवळ ४० व्यक्तींनाच सहभागी होता येणार
रत्नागिरी : मुंबई येथील प्रेरणा संस्थेचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरीत सुरू होत असून बालकांसोबत बालकांच्या हक्कासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील केवळ ४० व्यक्तींनाच यात सहभागी होता येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ३० ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन प्रेरणा संस्थेच्या जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे यांनी केले आहे. प्रेरणा- (ATC) संस्था, मुंबई गेल्या ३५ वर्षांपासून बाल संरक्षणावर काम करत आहे. संस्थेचे विविध उपक्रम मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात बाल संगोपन आणि बाल संरक्षण, बालकांच्या गरजा व पुनर्वसन यावर काम सुरू केले जाणार आहे. त्याअंतर्गत (SSCW) स्पेशलाइज सोशल केस वर्कर २०२४ प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्वयंसेवी भूमिका आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींना (शासकीय/निमसरकारी/वैयक्तिक/सामाजिक कार्य करणारे विद्यार्थी/लॉ कॉलेजचे विद्यार्थी) प्रशिक्षण दिले जाईल.प्रशिक्षणाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी बाल कल्याण समिती यांच्या परवानगीने जिल्ह्यातील ITPI व POCSO कायद्याअंतर्गत पीडित बालके तसेच काळजी, संरक्षणाची गरज असलेली बालके व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत काम करता येणार आहे.इच्छुक व्यक्ती या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील निवडक ४० व्यक्तींना सहभागी होता येणार असून, यात सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रेरणा संस्थेच्या (मुंबई) रत्नागिरी जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे (७०८३११००२७) यांनी केले आहे.