कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा अकराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले.
कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा अकराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडत आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठीच्या उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, याच्या पिलरच्या खोदाईचे काम सुरू असताना हे अवशेष सापडले असल्याची माहिती प्राच्य विद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली.आतापर्यंत सापडलेले अवशेष हे कुणकेश्वर मंदिर परिसराच्या बाहेर समुद्राकडील दक्षिण बाजूला सापडले आहेत. पण आता मंदिराचे हे अवशेष मंदिर परिसरात मंदिराच्या उत्तर बाजूला तटबंदीलगत आढळून आले आहेत. यात्रेवेळी भक्तनिवासातील दर्शन मंडपातून कुणकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या पुलाच्या पायासाठी दहा पंधरा फूट खोल खड्डे खोदाईचे काम सध्या सुरू आहे. खड्ड्यामध्ये दहा फुटाच्या खाली हा प्राचीन अवशेष आढळून आला आहे. तसेच कुणकेश्वर मंदिरालगत असणाऱ्या भैरव मंदिराचे जिर्णोद्धाराचे जे काम नुकतेच सुरू झाले आहे. या मंदिराच्या मंडपाचा भाग काढून टाकून तेथे नवीन बांधकाम करण्यासाठी चर खणण्याचे काम सुरू असताना या मंडपाच्या चौथऱ्यात काही जुने कोरीव काळ्या पाषाणाचे अवशेष आढळून आले आहेत.