दापोली येथे ५ ऑक्टोबर रोजी महाशिबीर पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागप्रमुखांचा आढावा.
रत्नागिरी, – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ५ ऑक्टोबर रोजी महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जस्मिन, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय आढावा घेवून सूचना दिल्या. ते म्हणाले, योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती आणि त्यांची एकत्रित यादी संबंधित विभागप्रमुखांनी द्यावी. महाशिबीराच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टॉलवर योजनांची माहिती प्रदर्शित करावी. हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनीही दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होवून मार्गदर्शन केले. बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.