कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात त्वरित अंमलबजावणी करावी, शेकडो डीएड, बीएडधारक जिल्हा परिषदेवर धडकले.
शासनाने ५ सप्टेंबर रोजी कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात काढलेला अध्यादेश कायम ठेवून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेकडो डीएड, बीएड बेरोजगार उमेदवार आग्रही झाले आहेत. त्यासाठी बुधवारी या बेरोजगारांनी जिल्हा परिषदेवर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.राज्य शासनाने गेल्या ५ सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेवर २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अध्यादेशही काढला आहे. कंत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. वर्षाला १२ रजा असून त्या शिक्षकांना प्रशासकीय अधिकार मात्र नसतील, असे म्हटले आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवावेत, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्याव्यात असेही म्हटले आहे.www.konkantoday.com