
महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय अनिवार्य केला जाणार -मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील सर्वच शाखांच्या अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय अनिवार्य केला जाणार आहेयामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूल्यांची ओळख होणार आहे. त्याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका ट्विटद्वारे दिली.
राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परीक्षा, प्रवेश आणि इतर कामकाजासंदर्भात बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांच्या विचारांची ओळख पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी यावर चर्चा झाली. त्यानंतर प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाण्याची शक्यता आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्या शाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
शालेय शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांच्या विचारांची माहिती तरुण पिढीला मिळावी यासाठी उपक्रमही राबवले जातात. संविधानाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा विषय सर्व विद्यापीठांतील विद्याशाखांसाठी अनिवार्य केला जाणार आहे.
www.konkantoday.com