महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 28 रिसॉर्टचा खासगीकरणाचा घातला घाट!

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटन स्थळी असलेली २८ रिसॉर्ट आणि तीन मोकळ्या जागांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू केली असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सिंहगड, पानशेत, कार्ला, भीमाशंकरसह नगर, ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नफ्यात चालणाऱ्या रिसॉर्टचा देखील समावेश आहे. खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य पर्यटकांना या ठिकाणी जादा शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे.’एमटीडीसी’च्या सर्व रिसॉर्टना वर्षभर पर्यटकांची पसंती असते. पर्यटनस्थळी मोक्याच्या ठिकाणी असलेली आणि खिशाला परवडणारी ही रिसॉर्ट असल्यामुळे नागरिकांकडून बुकिंगला प्राधान्य दिले जाते. सुट्टीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. असे असतानाही राज्य सरकारने त्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महामंडळाच्या ताब्यातील रिसॉर्ट व मोकळ्या जमिनी खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने तो निर्णय स्थगित ठेवला होता. आता पुन्हा सरकारने त्याला चालना दिली असून खासगीकरणासाठी ई-निविदा काढल्या आहेत. विशेष म्हणजे त्या निविदा भरण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत म्हणजे जागतिक पर्यटन दिनाच्या दिवसापर्यंत अंतिम मुदत दिली आहे.*या रिसॉर्टचे होणार खासगीकरण*पुणे जिल्ह्यातील सिंहगड, पानशेत, कार्ला, भीमाशंकर आदींसह वेळणेश्वर, गणपतीपुळे, शेळपी-निवती किल्ला (रत्नागिरी), तारकर्ली, कुणकेश्वर (सिंधुदुर्ग), कोयनानगर (सातारा), ओळवण दाजीपूर, ज्योतिबा यात्री निवास (कोल्हापूर), माळशेज घाट (ठाणे), ग्रेप पार्क (नाशिक), शिर्डी, भंडारदरा (अहिल्यानगर), सिल्लारी, गडपायली-अंभोर, टी.आर.सी.जी. (नागपूर), नवेगाव बांध, बोधलकसा (गोंदिया), चांदपूर (भंडारा), लोणार, शेगाव (बुलडाणा), माहूर (नांदेड), छत्रपती संभाजीनगर, वर्धा येथील रिसॉर्ट, चिखलदरा (अमरावती) येथील मोकळी जागा, फर्दापूर येथील पर्यटक निवास व मोकळी जागा (छत्रपती संभाजीनगर), मीठबाव येथील मोकळी जागा (सिंधुदुर्ग).खासगीकरण करण्याचा सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. हा निर्णय घेताना या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे तो रद्द करावा, या मागणीसाठी काळ्या फिती लावून आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच या रिसॉर्टवर काम करणाऱ्या कामगारांना कायम स्वरूपी कामावर घ्यावे, अशी देखील आमची मागणी आहे. *-सचिन अहिर, अध्यक्ष, एमटीडीसी कर्मचारी संघ*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button