
जगबुडी पुल आंदोलन प्रकरणी वैभव खेडेकर यांच्यासह अकरा जण निर्दोष.
भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर केलेल्या आंदोलनादरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दोन अधिकार्यांना पुलाला बांधण्याच्या प्रकरणातून मनसेचे राज्य सरचिटणीस ऍड. वैभव खेडेकर यांच्यासह ११ जणांची सोमवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात खेडेकर यांना तब्बल दीड महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. मनसे कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. अश्विन भोसले, ऍड. सिद्धी खेडेकर यांनी काम पाहिले.जुलै २०१९ मध्ये भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत मनसे व राष्ट्रवादीने १ तास महामार्ग रोखून धरला होता. वैभव खेडेकर यांच्या आक्रमकतेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना धारेवर धरले होते. ऍड. खेडेकर यांच्यासह मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी दोन्ही अधिकार्यांना पुलाला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला होता. www.konkantoday.com