‘आपले सरकार’ प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रशिक्षण संपन्न रत्नागिरी, दि.२५ (जिमाका) :- नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार 2.0” हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाला ऑनलाईन पध्दतीने तक्रारींचे निवारण करता यावे, यासाठी “आपले सरकार 2.0” ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी काल नियोजन समिती सभागृहात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला शासनातर्फे नियुक्ती करण्यात आलेले ई गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे व शुभम पै यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये आपले सरकार पोर्टलचे महत्व, आपले सरकार पोर्टलचे नागरिक व अधिकारी यांच्यासाठी फायदे व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारींचा शंभर टक्के निपटारा कसा करायचा याबाबतचे याबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालयाचे प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.