शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला दोन रुग्णांचा मृत्यू! मुंबई : क्षयरोगाच्या उपचारासाठी समर्पित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला साधारण दोन ते तीन रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू होत आहे. मागील साडेतीन वर्षांत क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचे काम सुरू असल्याने आणि भूलतज्ज्ञ नसल्याने साडेतीन वर्षांत फक्त चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी रुग्णालयात मागील साडेतीन वर्षांत तब्बल ३ हजार १८५ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांची संख्या २ हजार १२६ तर एक हजार ५९ महिलांचा समावेश आहे. २०२१ मध्ये ९७४ जणांचा मृत्यू झाला होता तर २०२२ मध्ये ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये ८५५ रुग्णांचा आणि मे २०२४ पर्यंत ३९७ जणांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही वर्षांत काहीअंशी घट दिसून येत आहे. मात्र क्षयरोगाने साधारणपणे दिवसाला दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे.औषध संवेदनशील रुग्णांचे प्रमाण अधिक मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्येही औषध संवेदनशील (ड्रग सेन्सेटिव्ह) रुग्णांची संख्या औषध प्रतिरोधक (ड्रग रेसिस्टंट) रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. २ हजार २७७ औषध संवेदनशील रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे तर औषध प्रतिरोधक (ड्रग रेसिस्टंट) असलेल्या ९०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.क्षयरोगावर घरी उपचार होत असल्याने एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यावरच त्याला रुग्णालयात आणले जाते. अनेक रुग्णांमध्ये प्राणवायूची मात्रा कमी असते. त्यांना गोळ्यांची मात्रा लागू होत नाही. मद्यपान, मधूमेह, एचआयव्ही यांसारखे अन्य आजारही त्यांना झालेले असतात. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना वाचविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. औषध संवेदनशील रुग्ण हे बऱ्याचदा थोडासा आराम मिळाल्यानंतर औषधे घेणे बंद करतात. तसेच क्षयरोगाचे औषधे ही सलग सहा महिने घेणे आवश्यक असून रुग्ण मध्येच औषधे घेणे बंद करतात. परिणामी त्यांची प्रकृती अधिक बिघडते, अशी माहिती शिवडी क्षयरोग रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button