केंद्राचे आदेश धुडकवून तेल कंपन्यांकडूनखाद्यतेलाच्या किमतीत प्रतिलिटर २० रुपयांनी वाढ.
खाद्यतेलावर आयात शुल्क लागू करण्यापूर्वी आयात झालेल्या सुमारे ३० लाख टन तेलाची विक्री वाढीव दराने करू नये, अशी सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना केली होती. तरीही कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात प्रतिलिटर सरासरी २० रुपयांनी वाढ झाली आहे.खाद्यतेल दर नियंत्रित करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न फसले आहेत.केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या तेलबियांना हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांचा रोष कमी व्हावा म्हणून कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के केला आहे. त्याचा तत्काळ परिणाम खाद्यतेल बाजारावर दिसून आला. खाद्यतेल कंपन्यांनी तातडीने दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती प्रतिलिटर २० रुपयांनी वाढल्या आहेत.केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने खाद्यतेलाची संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी खाद्यतेल कंपन्यांना आयात शुल्क वाढविण्यापूर्वी देशात स्वस्तात आयात झालेल्या सुमारे ३० लाख टन तेलाचा विक्री वाढीव दराने करू नये. हे तेल सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल. या काळात दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण होऊन जातील. त्यानंतर वाढीव आयात शुल्क आकारून आयात केलेल्या तेलाची वाढीव दराने विक्री करावी, असे सूचना वजा आदेश दिले होते.