
“देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला?” काँग्रेस नेत्यांचा सवाल! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांकडून बंदुक हिसकावली. त्यानंतर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत होतं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “हे एकन्काऊंटर बोगस आहे. इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आलं. राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी हे आदेश दिले? जी गोष्ट घडली त्यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का ? हा प्रश्न पडतो आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते ते कधीही समोर येणार नाही. बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारुन टाकलं जात असेल तर गृहमंत्र्यांचा काही वचक राहिला आहे की नाही? ” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. एबीपी माझाला त्यांनी फोनवरुन सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी हे सवाल उपस्थित केले.*नाना पटोलेंचे गृहमंत्र्यांना सवाल*बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.*या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.*१. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?२ . फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?३. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.असे प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केले आहेत.*नेमकी घटना काय घडली?*बदलापुर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.