जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आईला ३ हजार रुपयांचा उदरनिर्वाह भत्ता न देणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आईला ३ हजार रुपयांचा उदरनिर्वाह भत्ता न देणाऱ्या मुलाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईला उदरनिर्वाह भत्ता न दिल्याप्रकरणी दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.राजू ऊर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. फिनोलेक्स कॉलेजजवळ, मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काॅन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शोभा विठ्ठल तळेकर (रा. मिरजोळे,रत्नागिरी) यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे उदरनिर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी १४ फेब्रुवारी २०२४ ते अपिलाचा दिनांक लागेपर्यंत प्रतिमहिना ३ हजार रुपये शोभा तळेकर यांना देण्याचे आदेश दिला हाेता. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात म्हटले होते. आदेशाचे पालन मुलाने केले नसल्याची तक्रार शोभा तळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका अर्जाद्वारे केली होती, त्याआधारे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू तळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.