
कै. निलेश बापट यांच्या संकल्पना वनविभाग पुढे नेईल -विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई.
चिपळूण :: कै. निलेश बापट हे वन विभागाचे स्ट्रॉंगपिलर होते. ते निसर्गवल्ली, वृक्षवल्ली होते. त्यांनी निसर्गासाठी तन-मन-धन अर्पून काम केलं. रत्नागिरी जिल्ह्यात साप, बिबटया, व्हेल, मगर यांची रेस्क्यू ऑपरेशन खूप असतात. अशा सर्वच ठिकाणी ते पुढे असायचे. वन विषयातील संवर्धन, नवीन योजना यावर ते विस्तृत बोलायचे. त्यांच्या या संकल्पना-योजना वनविभाग पुढे नेईल, अशी भावनाविभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, यांनी व्यक्त केल्या.भारतभरातील जंगलांचे चिकित्सक अभ्यासक, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षस कै. निलेश बापट मित्र परिवाराच्या वतीने आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या. कै. निलेश बापट यांची शोकसभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर ग्लोबल चिपळूण टुरिझमचे चेअरमन श्रीराम रेडिज, जिल्हा वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई-पाटील, कै. निलेशचे काका श्री. बापट उपस्थित होते. प्रास्ताविक संजीव अणेराव यांनी केले. गिरीजा देसाई पुढे म्हणाल्या, कै. निलेश बापट यांच्या योजना वनविभाग पुढे नेईल. नेचर एक्झिबिशन हॉलबाबतही त्यांनी सांगितलं होतं. ८४ वर्षे जगून जितकं काम होऊ शकत नाही, तितकं काम निलेश यांनी ४८ वर्षात केलं. वनविभागाला त्याची उणीव कायम जाणवेल.श्रीराम रेडिज म्हणाले, ३० वर्षांपूर्वी पासून निलेश आमच्यासोबत सह्याद्रीत येऊ लागला. पुढे आम्ही जिथे जायचो तिथे तो नंतरही जाऊ लागला. तिथे चार-चार दिवस रमू लागला. आयटीआय झाल्यावर त्याने गाड्यांची दुरुस्ती सुरू कामे केली. निलेश गाड्यांचा फौल्ट अचूक सांगायचा. अफाट शारीरिक ताकद असलेला निलेश सह्याद्रीचा खराखुरा वाघ होता. वृक्षतोड विरोध करतानाचे अनेक बाके प्रसंग त्याने अंगावर सोसले होते. निलेशसारखा निसर्गप्रेमी होणे नाही. चिपळूणला सर्व संस्थांच्या वतीने २६ सप्टेंबरला होणारा पर्यटन दिन कार्यक्रम, निलेशला अर्पण करीत आहोत असे रेडिज यांनी नमूद केले.यावेळी सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे, सेवानिवृत्त अभियंता दीपक जोशी, अनिरुद्ध केतकर, विलास महाडिक, मनोज गांधी, डॉ. प्रकाश जोशी, कै. निलेशच्या भगिनी सौ. धनश्री केळकर, धीरज वाटेकर, ओंकार रेडिज, शाहनवाज शाह, विश्वास पाटील, संतोष चाळके (रासाटी-कोयना), कौस्तुभ खरे, डॉ. मीनल ओक आदींनी मनोगत व्यक्त केली.कै. बापट यांच्या अस्थींचे कोयना नदी, गुहागर, धामणवणे येथे विसर्जन करण्यात आले. वड, पिंपळाची झाडे लावण्यात आली. शोकसभेला यावेळी कै. बापट यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश बापट यांनी केले.