उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरणशहरातील सीआरपींनाही मोफत मोबाईल देऊ -पालकमंत्री उदय सामंत.
रत्नागिरी, : जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधान व्यक्तींना अर्थात सीआरपींना मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे. या योजनेच्या लाभातून स्वत:च्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींकडे असणार आहे. याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढतानाच शहरातील सीआरपींनाही मोबाईल दिले जातील, अशी घोषणा केली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत राजापूर आणि लांजा तालुक्यातील सीआरपींना जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत आज राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात मोफत मोबाईल वितरण करण्यात आले. याप्रसंगी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सीआरपींच्या बैठकीमध्ये काही प्रश्न त्यांनी मांडले होते. त्यामध्ये त्यांचे मानधन दुप्पट करणे, ते 3 हजारांवरुन 6 हजार करण्यात आले आहे. बचत गटांचा रिव्हालव्हींग फंड 15 हजारावरुन 30 हजार केला आहे. यावेळी चर्चा करताना मला असे लक्षात आले, 50 टक्के महिलांकडे स्वत:चा अँड्राॕईड मोबाईल नाही. मुलाचा, भावाचा, नवऱ्याचा असा घरातील इतर मंडळीचा मोबाईल ते कामकाजासाठी वापरत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी डीपीसीमधून त्यांना मोफत मोबाईल देण्याची मी घोषणा केली होती. ते मोबाईल त्यांना आज वाटप करताना मला मोठा आनंद होत आहे. असा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. मी रायगड जिल्ह्याचाही पालकमंत्री असल्याने तेथील सीआरपींना देखील मोबाईलचे वाटप करण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही फसवणारी नसून, महिलांना उन्नत करणारी आणि राज्याला सक्षम करणारी योजना आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील ६० हजार २७४ महिला भगिनींच्या खात्यावर जवळपास ९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे या महिला विविध कारणांसाठी खर्च करणार आहेत. म्हणजेच हे पैसे व्यापाऱ्यांना जाणार आहेत, व्यापाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना आणि टॅक्सला जाणार आहेत. म्हणजेच ही योजना राज्याला देखील सक्षम करणारी आहे. ही योजना कधीही रद्द होणार नाही. उलट दीड हजारांमध्ये वाढच केली जाईल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु. शासनाच्या विविध योजनांचा सगळ्यांनी फायदा घ्यावा, हे शासन तुमच्या भावांचे आहे, असे सांगून मोबाईल आणण्यासाठी किरणभैया सामंतांनी यंत्रंणा राबविल्याचेही ते म्हणाले. *उर्वरित ५ प्रभागसंघांना १ कोटी* राजापूर आणि लांजामधील प्रभागसंघाच्या कार्यालयांसाठी १ कोटी दिले आहेत. उर्वरित ५ प्रभाग संघांनाही १ कोटी दिले जातील, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला बचत गटामार्फत चालविली जाणारी हाऊस बोट ५ तारखेला जिल्ह्यात येत आहे. या माध्यमातून बचत गटांना अर्थार्जन होणार आहे. त्याचबरोबर ३२ लाख रुपयांच्या ४ ‘सिंधुरत्न’ मधून देण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटन होणार आहे. त्यासाठी ८ महिला, चालकाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामधूनही महिला सक्षम होणार आहेत. गटविकास अधिकारी टी पी जाधव यांनी स्वागत प्रस्ताविक करुन माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आणिक्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला लांजा आणि राजापूर तालुक्यातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.