रत्नागिरी रेल्वेस्थानकानजीक रस्त्यावर ब्राऊन हेरॉईन व गांजा विकण्यासाठी आलेल्या कर्ला येथील दोघा तरुणांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहाथ जेरबंद केले.
रत्नागिरी शहराजवळील रेल्वेस्थानकानजीक असणार्या सबस्टेशनजवळील रस्त्यावर ब्राऊन हेरॉईन व गांजा विकण्यासाठी आलेल्या कर्ला येथील दोघा तरुणांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहाथ जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे सव्वालाखाचे अंमलीपदार्थ हस्तगत केले.शहरातील न्यू कर्ला भागात राहणार्या मुहाफीज यासीन सोलकर (30) आणि फुरकान पाशा जागीरदार (28) यांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी आपल्या सहकार्यांसह ही कारवाई केली. रात्री पोलीस निरीक्षक तोरसकर यांना पोलीस हवालदार राहूल जाधव यांनी दोघेजण रेल्वेस्थानकाजवळ असणार्या विद्युत सबस्टेशनजवळील रस्त्यावर सोलकर व जागीरदार हे दोघे ब्राऊन हेरॉईन व गांजा विकण्यासाठी येणार असल्याचे खात्रीशीर माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक तोरसकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला. दोघेही सांगितेल्या ठिकाणी आले असताना त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून 350 कागदी पुड्यामध्ये 13 ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आढळले तर तीन हजाराचा 112.5 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. सुमारे 1 लाख 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करीत जप्त केला.