
रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर होणारे भराव, समुद्रात सोडले जाणारे केमिकलमिश्रित सांडपाणी; रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड नष्ट होण्याच्या मार्गावर!
समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल कंपन्यांचे सांडपाणी यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादन सुमारे तीन हजार मेट्रिक टनांनी घटले आहे. मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमारांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जिताडा, रावस आणि शेवंड हे सर्वाधिक मागणी असणारे मासे समुद्रातून गायब झाल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर दर्जेदार मासळी मिळते. त्यासाठीच कोकणची किनारपट्टी ओळखली जाते. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील 112 गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. 4 हजार 943 नौकांच्या माध्यमातून 30 हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. रायगड जिल्ह्यात पूर्वी वर्षाला सरासरी 42 हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येत होती. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. सध्या 39 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन वर्षभरात घेतले जात आहे. त्यातच प्रमुख माशांच्या प्रजातींचेही उत्पादन घटल्याने मासेमारीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारी उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मच्छीमारांनी केला जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली असतानाच बाजारात जास्त दर असलेल्या जिताडा, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या जातीच्या मासळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेली, बांगडा, बोंबिल या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासेमारांना थोडा दिलासा मिळाला आहे.*