रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी.
रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे या हॉस्पिटलचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशीच रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीमधील पूर्णाकृती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचेही अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असल्याच्या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या मिस्त्रीविल्ला येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासन योजनांतर्गत सर्व उपचार, तपासण्या, डायलेसीस, शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. अपघात विभागासह इतर सर्व अत्यावश्यक सेवा 24 तास खुल्या राहणार आहेत. या सर्व सेवा मुंबईच्या साधना फाऊंडेशनमार्फत दिल्या जाणार आहेत.पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्वप्नातील या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पात सर्व रोगनिदान, आयसीयु, ऑपरेशन थिएटर आहे. याठिकाणी कॅन्सर ऑपरेशन, किमो थेरपी, मेंदूसह हाड, मणका, कंबर, गुडघा, लिगामेंट शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहेत. किडणी व ग्लेडर ट्रीटमेंट, किडणी शस्त्रक्रिया, हर्निया, गॉलब्लेडर, अपेंडिक्स, पाईल्स, फिशर यासह इतर अनेक आजारांच्या शस्त्रक्रिया येथे होणार आहेत.नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग असून डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासणी, लघवी, थुंकी अशा सर्व तपासण्यासुद्धा निशुल्क आहेत.