
गारीगार विका, पाव विका, बटर विका एकवेळ गरीब राहा पण राजकारण्यांच्या नादी लागू नका- कीर्तनकार इंदुरीकर महाराज.
राजकारण्यांच्या नादी लागून आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. जी माणसे राजकारण्यांच्या नादी लागली त्यांच्या मृत्यूसमयी त्यांना चहा प्यायलाही मिळाला नाही. गारीगार विका, पाव विका, बटर विका एकवेळ गरीब राहा पण राजकारण्यांच्या नादी लागू नका, असे कळकळीचे आवाहन कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले.अकोल्यात आयोजित कीर्तनसेवेत इंदुरीकर महाराज बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी जनतेशी थेट संपर्कात येण्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. देशमुख यांनी आयोजित केलेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी रोखठोक भाष्य करीत राजकारण्यांना फटकारले.ज्यांनी आयुष्यभर भोंगे बांधायला मुलांना वापरून घेतले, तेच राजकारणी आज युवकांना नोकरीचे मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळावे घेत आहेत. नोकरी महोत्सवाच्या कार्यक्रमातून किती पोरांना नोकऱ्या लागल्या? असा सवाल त्यांनी विचारला. आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचेच आहेत, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.तुला धर्माचा अभिमान नाही का, असे जर एखाद्याने विचारलं तर त्याला सांगा, तुला धर्म माईकवर आहे पण माझा धर्म माझ्या हृदयात आहे. राजकारण्यांनी स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करणे थांबवावे. धर्माचे अवडंबर माजवून गरिबांच्या पोरांचे बळी घेऊ नयेत, असे सांगत गरिबांचे लेकरेच जेलमध्ये जातात, कधीही श्रीमंतांची लेकरे दंगलीच्या गुन्ह्यात जेलमध्ये जात नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.