सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांची रूपडे बदलतआहे.
कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे.हे रेल्वेस्टेशन आहे की विमानतळ, असा प्रश्न पाहणाऱ्याला नक्कीच पडतो. चिपळूण, सावंतवाडी, कणकवली, राजापूर, संगमेश्वरसह अनेक रेल्वेस्थानकांचा चेहरामोहराच बदलत आहे. त्यानुसार रत्नागिरी रेल्वेस्थानकाचेही रूपडे पालटत आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत रत्नागिरी स्थानकातील काम पूर्ण होईल आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त रत्नागिरी रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.कोकण रेल्वेची अनेक रेल्वेस्थानके ही शहरापासून बाहेर व मुख्य रस्त्यांपासून थोडी एका बाजूला आहेत. त्यामुळे या रेल्वेस्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली होती. हा प्रकार सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. त्यांनी प्रथम जोडरस्त्यांची कामे मार्गी लावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वेस्थानकांच्या अद्ययावतीकरणाची कामे सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालत प्रमुख रेल्वेस्थानकांची निवड केली. यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. चिपळूण व संगमेश्वर रेल्वेस्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अभियंत्याने सांगितले.