शेखर निकम यांनी घेतली नाना पाटेकर यांची भेट.
जिल्ह्यातील विविध नद्यांमधील गाळ उपसा करण्यावर नाम फाऊंडेशन व जलसंपदा विभाग यांच्यात झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी रविवारी पुणे येथे जावून नाम फाऊंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली. चिपळूणसह संगमेश्वरमधील उपनद्यांमधील गाळ उपसा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंढण गावाच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली. या दोन्ही प्रश्नांवर पाटेकर यांच्याकडून सहकार्याची हमी देण्यात आली.महापुरानंतर गाळ उपशासाठी नाम फाऊंडेशनने चिपळूणला भरभरून मदत करताना शिवनदी गाळमुक्त केली. त्याचबरोबर दसपटीतील ओवळी गावातील धनगरवाडीतील सुमारे २२ ते २५ कुटुंबांना आकले येथे घरे बांधून त्यांच्या पुनर्वसनाची मोठी जबाबदारी उचलली. अशातच आता जिल्ह्यातील १५ नद्यांमधील सुमारे १४ ते १५ लाख घनमीटर गाळ उपसण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाम फाऊंडेशन व जलसंपदा विभाग यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच सामंजस्य करार झाला. यामध्ये जलसंपदा विभागाकडे असलेले चिपळूण वाशिष्ठी नदीमधील ३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे.www.konkantoday.com