
माजी आ. वैभव नाईक, पत्नीची रत्नागिरी ‘एसीबी’कडून साडेसहा तास चौकशी.
शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची रत्नागिरीत एसीबीने मंगळवारी तब्बल साडेसहा तास चौकशी केली.रत्नागिरी एसीबी कार्यालयात नाईक दाम्पत्याची दुपारी 12 वा.पासून चौकशी सुरू होती. या कालावधीत वैभव नाईक यांनी संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने विविध कागदपत्रे एसीबीच्या अधिकार्यांसमोर सादर केली. मागच्या दोन वर्षांमध्ये माजी आमदार वैभव नाईक आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी हजर राहिले आहेत.
एसीबीच्या चौकशीमध्ये वैभव नाईक यांचा आणि त्यांच्या पत्नीचा इन्कम सोर्स, शिवाय खरेदी केलेल्या जागा यांची माहिती मागितली गेली. संपूर्ण माहिती त्यांनी एसीबीला हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे एसीबीने मागितलेली अन्य माहिती देखील त्यांना दिली जाणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.वैभव नाईक यांनी एसीबीच्या संपूर्ण चौकशीमध्ये आपल्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य असेल, अशी प्रतिक्रिया मंगळवारची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दिली आहे.