
रत्नागिरी रेल्वेस्टेशनहून जाणार्या वडापच्या गाडीत चाकरमान्याला लुटले
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनपासून पावसपर्यंत जाणार्या एका वडापच्या गाडीत (टाटा सफारी क्र.6681) एका प्रौढाला लुटण्याचा प्रकार मंगळवारी 18 रोजी घडला. ड्रायव्हर आणि पाठीमागे बसलेल्या दोघांनी प्रौढाच्या बॅगेतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी 7 ते 7.45 वा. सुमारास ही घटना घडली. सुरेश दत्ताराम रसाळ (वय 65, मूळ रा. निरुळ तेलीवाडी, रत्नागिरी, सध्या रा. भाईंदर, मुंबई) असे या लुटलेल्या प्रौढाचे नाव आहे. त्यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुरेश रसाळ हे निरूळ गावी जाण्यासाठी मंगळवारी सकाळी रल्वेने रत्नागिरीत आले. रत्नागिरी रेल्वेस्टेशनबाहेर ते एका वडापच्या टाटा सफारी (क्र.6681) मध्ये पावस एसटी स्टँडला जाण्यासाठी बसले. यानंतर चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या दोघांनी रसाळ यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये एक सोन्याचा हार, अंगठी, कानातील कुड्या, कानातील रिंग, सोन्याचा क्वॉईन आणि रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख 66 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.