
चाळिशी पार केलेल्या ‘एसटी’ कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक दोन आर्थिक वर्षांत एकदा ११ प्रकारच्या तपासण्या बंधनकारक राहणार असून, त्याचा खर्चही महामंडळ उचलणार आहे. चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीअंतर्गत सीबीसी, थायरॉईड, ब्लड शुगर एचबीएआयसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे-ईसीजी, सीआरपी टेस्ट, आय टेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) या तपासण्या करणे बंधनकारक आहे.कर्मचाऱ्यांसाठी ही योजना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च दरम्यान लागू आहे. परंतु, बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाने तपासणीबाबत पत्र काढले आहे. महामंडळात एकूण ८६ हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत. या सर्वांना दोन आर्थिक वर्षात एकदा या तपासणी करायच्या आहे. वरीलपैकी एकही तपासणी न केल्यास या रकमेची प्रतिपूर्ती महामंडळ करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.