
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. शाळास्तरावर काटेकोर अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागामार्फत सूचना देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत दररोज शाळानिहाय आढावाही घेत आहेत. अंमलबजावणी न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जि.प. प्रशासनाने दिला आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबींची शासन स्तरावर गंभीर दखलही घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. या तरतुदीचे पालन न करणार्या शाळांच्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे.