पैशाचे आमिष दाखवून महिलेला लाखोंचा ऑनलाईन गंडा.
रत्नागिरी येथील महिलेला पैशाचे आमिष दाखवून लाखोंचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ रोजी घडली. फसवूक झाल्याप्रकरणी या महिलेने शनिवारी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.पियुष यादव व मीनाक्षी गानोस्कर अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर लिंक पाठवून एक टास्क करण्यास दिली. ही टास्क पूर्ण केल्यास आपल्याला जास्तीचा परतावा मिळेल असे आमिष दाखविले. त्यानुसार संशयितांनी दिलेल्या लिंकवर महिलेने त्या बँक खात्यावर १ लाख ३ हजार रुपये जमा केले.महिलेने भरलेल्या पैशापैकी केवळ ३ हजार रुपये आरोपींकडून परत आले. तर उर्वरित १ लाख रुपये परत न करून आपली फसवणूक केल्याची तक्रार या महिलेने रत्नागिरी शहर पोलिसांत दिली. या प्रकरणी पोलिसांनी या दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com