राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद! चंद्रपूर: शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवून १५ हजार शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तेव्हा सदर शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले. बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन २०११ पासून राज्यात लागू करून १३ वर्षे झाली तरी अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता १ ते ५ व उच्च प्राथमिक स्तर ६ ते ८ हा आकृतीबंध अध्याप लागू केलेला नाही. आकृतीबंध लागू करणेबाबत शासन निर्णयही झालेत मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत आहे.असे असताना राज्य शासनाकडून १५ मार्च २०२४ च्या शासननिर्णय द्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. वाडीवस्तीवर जन्म झाला म्हणून पटसंख्येअभावी शिक्षक कमी करून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. वाडी-वस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय? त्याला इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क व अधिकार बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियमाने दिला आहे तो हक्क शासनास डावलता येणार नाही असेही मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.या बैठकीस शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव (शिवाजी पाटील), शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, आखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतिश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काटोळे, एकल शिक्षक सेवा मंच राज्याध्यक्ष विकास खांडेकर, उपस्थित होते अशी माहिती राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button