
रत्नागिरीची आगळवेगळी ५४ वर्षांची परंपरा दर्याला नारळ देण्याचा पहिला मान पोलिसांचा.
.बा दर्या राजा शांता हो, अशी प्रार्थना करत दर्याला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे.परंतु पोलिस दलामार्फत सोन्याचा नारळ दर्याला का अर्पण करतात याचे आजही कुतुहल आहे. ही परंपरा ५४ वर्षांपूर्वीची म्हणजेच १९७० पूर्वीची आहे. मच्छीमार, खारवी समाजाशी पोलिसांचे संबंध दृढ राहावे, नैसर्गिक आपत्ती किंवा संकटा पासून रत्नागिरीचे रक्षण व्हावे, या उदात्त हेतूने पोलिसांचा सोन्याचा नारळ वाजत गाजत पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सर्वप्रथम दर्याला अर्पण केला जातो. समाजाकडून दर्याला शांत राहण्यासाठी आणि त्यांना मच्छीमारीमध्ये बरकत मिळावी, यासाठी नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून शांत राहण्याची प्रार्थना केली जाते. कस्टम विभागाकडूनही दर्याला नारळ अर्पण केला जातो. समुद्रामार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क दल (कस्टम) हे काम करते. समुद्रात वारंवार त्यांची गस्त सुरू असते. त्यामुळे समुद्रापासून आपले रक्षण व्हावे, या उद्देशाने ते देखील नारळीपौर्णिमेला नारळ अर्पण करतात. पोलिस दलातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली असता १९७० पूर्वीपासूनची ही परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस मुख्यालयातील महापुरुषाच्या मंदिरातून हा सोन्याचा नारळ वाजत गाजत निघतो. मांडवी जेटीवरून दर्याला मनोभावे प्रार्थना करून हा नारळ अर्पण केला जातो. नारळ अर्पण करण्याचा पहिला मान पोलिस दलाचा असतो. त्यानंतर कस्टम आणि मच्छीमार सागराला नारळ अर्पण करतात.