
काताळे बंदरातील महाकाय जहाजावर पडले ज्येष्ठ नागरिकांचे पाऊल
रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांची मरीन सिंडिकेटच्या जहाज दुरुस्ती प्रकल्पाला भेट.
रत्नागिरी : कोकणचे सुपुत्र मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर यांनी मरीन इंजिनियर म्हणून जगातील २८ देशात सागराचे आव्हान स्वीकारून जहाज दुरुस्तीचे अद्यावत तंत्रज्ञान पोहोचविले . त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काताळे येथील बंदरात मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत स्थानिक तरुण इंजिनियर आणि तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देऊन जहाज दुरुस्तीचा भव्य प्रकल्प नावारूपाला आणला आहे.
रत्नागिरी येथील ज्येष्ठ नागरिकांनी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी या बंदरातील सिंगापूर कंपनीच्या महाकाय “क्रेस्ट मर्क्युरी” या जहाजावर जाऊन जहाज दुरुस्ती आणि देखभालीचे आव्हानात्मक काम कशाप्रकारे पूर्णत्वास नेले जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. महाविद्यालयातील प्राध्यापकाचे कार्यक्षेत्र बदलून मरीन इंजिनियर म्हणून मरीन सिंडिकेटच्या परिवारात सहभागी होऊन या कंपनीच्या असोसिएट डायरेक्टर म्हणून टीमचे नेतृत्व करणाऱ्या इंजिनियर सौभाग्यवती संज्योक्ती सुर्वे यांनी जहाजावर आलेल्या ज्येष्ठांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर यांनी मरीन सिंडिकेटने काताळे बंदरात स्वतःचा दुरुस्ती प्रकल्प आव्हान म्हणून स्वीकारून आजपर्यंत केलेल्या वाटचालीची माहिती दिली.
समुद्रात हेलकावे खाणाऱ्या या जहाजावर वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुष महिलांनी वयाचे भान विसरून धाडसाने जहाजावर चढून तेथील इंजिन रूम, व्हील रूम, कॉम्प्युटर कक्ष, नियंत्रण कक्ष, किचन रूम, मेस रूम आदी विविध कक्षांची माहिती घेतली. पाण्याखाली असलेल्या तळमजल्यावर जाऊन ऊन पावसाची नैसर्गिक आव्हाने स्वीकारून काम कसे चालते याची पाहणी केली. मरीन सिंडिकेटच्या काताळे बंदरातून कोकणातील जांभ्या दगडाचीही बहुमोल खनिज म्हणून जहाजातून वाहतूक केली जाते.
मरीन सिंडिकेटने जहाज दुरुस्तीच्या आव्हानात्मक कामाबरोबरच मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर यांच्या नेतृत्वाखाली समुद्रात बुडालेली जहाजे बाहेर काढण्याची अति अवघड कामे स्थानिक तंत्रज्ञ आणि इंजिनिअरच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्णत्वास नेली आहेत. एवढेच नव्हे तर देवगड समुद्रात बुडालेल्या “अल मुर्तुदा” या महाकाय परदेशी जहाजाला सागराच्या लाटांवर आरुढ होत स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रातून बाहेर काढून बंदरात आणण्याचा भीम पराक्रम केलेला आहे. मुलींचा सहभाग असलेले काताळे हे भारतातील एकमेव बंदर आहे.
गेल्या ७ ते १४ सप्टेंबर २०२४ या गणेशोत्सवाच्या काळात मंगलोर येथील जे एम बोट सर्विसेस कंपनीची, तळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी काताळे बंदरात दाखल झालेली बोट काताळे टर्मिनल वरील स्लीप वे वर चढवून साफसफाई रंग कामासह यशस्वीरित्या दुरुस्त करून पुढील प्रवासासाठी 16 सप्टेंबर रोजीच दाभोळ बंदराच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मरीन सिंडिकेटच्या या अशा अनेक प्रकल्पांची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर यांच्याकडून उत्सुकतेने जाणून घेतली आणि हे आव्हानात्मक काम स्थानिक इंजिनियर आणि दर्यावर्दी सागराच्या लाटावर आरूढ होत कोकणच्या सागरी इतिहासात एक नवा अध्याय घडवीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
त्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये 88 वर्ष वयाचे श्री. सुरेश विष्णू उर्फ अण्णा लिमये समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे, सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी श्री. राजेंद्र शंकरराव कदम, सेवानिवृत्त माहिती अधिकारी श्री. प्रभाकर कासेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या होत्या. काताळे बंदर कोकणच्या सागरी क्षेत्रात भविष्यात मैलाचा दगड ठरेल, अशा शुभेच्छा ज्येष्ठ नागरिकांनी मरीन सिंडिकेटला दिल्या.