मंडगाव-पनवेल या जादा रेल्वे गाडीच्या वातानुकूलित बोगीतील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल.
मंडगाव-पनवेल या जादा रेल्वे गाडीच्या वातानुकूलित बोगीतील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. संतप्त प्रवाशांनी ट्रेन वैभववाडी स्थानकात आल्यानंतर तब्बल अर्धा तास रोखून धरली.यावेळी रेल्वे प्रशासनाने येथे एसी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रेल्वे रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही घटना रविवारी (दि.१५) दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. गणेश उत्सवानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेसह एस.टी बस, खाजगी आराम बस, अशा मिळेल त्या वाहनाने मुंबई-पुणे शहराकडे जात आहेत. त्यामुळे सगळीकडे गर्दी आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेऊन जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातीलच मडगाव-पनवेल ही गाडी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पनवेल साठी मार्गस्थ करण्यात आली. या रेल्वेतील वातानुकूलित बोगीतील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्याकडून कणकवली एसीतील बिघाड दुरुस्त करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र कणकवली तिथेही दुरुस्ती न करता गाडी तशीच पुढे मार्गस्थ करण्यात आली.