रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय अडचणीत, शासनाच्या नियमाचा फटका.
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे व आता शासनाच्या विविध नियमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय अडचणीत येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारीला राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी एकही परवाना दिलेला नाही. त्यामुळे अनेक नौका मालकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. नौका मालक यामुळे बिथरले असून पर्ससीन नेट नौका विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. काही पर्ससीन नेट नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजे 12 नॉटीकल मैलच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. यामुळे नौका मालकांचा आर्थिक खर्च वाढला आहे.पर्ससीन नेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी या नौकाना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मासेमारी नौका नुतनीकरण परवाना, बंदर परवाना दिला जातो. परंतु चालू हंगामात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला गेेलेला नाही.राज्यातील मासेमारी धोरणाचा सामवंशी अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या 167 कि.मी. समुद्र क्षेत्रात 183 पर्ससीन नेट नौका ठेवण्याचे सूचित करण्यात आले. अहवालातील इतर सूचनांनुसार फेब्रुवारी 2016 साली राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पर्ससीन नेट मासेमारी आठ महिन्यांवरून चार महिन्यांवर आणण्यात आली. शासनाने आता तर नौका नुतनीकरण परवाने देण्याबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे एकाही पर्ससीन नौकेला सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणताही परवाना देण्यात आलेला नाही.रत्नागिरी जिल्ह्यात 474 पर्ससीन नौका होत्या. खर्चाच्या तुलनेत मासे न मिळणे, समुद्रातील वातावरणाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे पर्ससीन नेट नौका कमी होत गेल्या. गेल्यावर्षी या नौकांची संख्या 280 पर्यंत आली होती. शासनाच्या सूचनेनुसार 183 नौकानाच परवाने देण्याची तयारी सुरू होती. परंतु यासंदर्भात परवाना नुतनीकरणाबाबत कोणतेही निर्देश न आल्याने एकाही नौकेला राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्याची परवानगी नाही.