मिर्या येथील एमआयडीसीला स्थानिकांसह आता गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनीही विरोध.
रत्नागिरी शहरा जवळील मिर्या येथे होऊ घातलेल्या एमआयडीसीला स्थानिकांसह आता गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनीही विरोध दर्शवला असून, लवकरच येणार्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मिर्या-मुरुगवाडा नाक्यावर पर्यटन आणि शांतता असा बोर्ड लावत शासन शांतता भंग का करीत आहे असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.मिर्या येथे पोर्ट एमआयडीसी प्रस्तावित असून याला सडामिर्या-जाकिमिर्यासह सर्वच मिर्यावासियांनी विरोध केला आहे. सडामिर्यासह ग्रुप ग्रामपंचायत मिर्याच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये विरोधाचा ठराव केला. त्यानंतर मुरुगवाड्यापासून सडामिर्यापर्यंतच्या ग्रामस्थांची अलावा याठिकाणी चौकात सभा होऊन आम्हाला एमआयडीसी नकोच असा नारा दिला होता. माजी आमदार बाळ माने यांनीही आपल्या गावात एमआयडीसी नको असल्याचे स्पष्ट केले. पर्यटनदृष्ट्या हे गाव विकसित करायचे सोडून एमआयडीसी आणण्यामागे कारण काय असा प्रश्न येथील तरुण वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे. मासेमारी, आंबा यावर येथील कुटूंब आपला चरितार्थ चालवत आहेत. पर्यटनदृष्ट्या या गावाचा विकास करण्यात यावा अशी मागणी होत आहे.