चंद्रचूड हे जोपर्यंत या खूर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही’,-संजय राऊत.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली. यानंतर सरन्यायाधीशांच्या या कृतीविरोधात ज्येष्ठ वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हा संदर्भातील खटला, आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांची खासगी भेट यामुळे न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. यांसदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.सोलापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘चंद्रचूड हे जोपर्यंत या खूर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही’, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.‘चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत. या देशाच्या घटनेचे रखवालदार आहेत, देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत. या राज्यातील घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रेरणेनंआलेलं आहे. हे संविधान विरोधी सरकार आहे. पण ज्या पद्धतीने काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केली, त्या आरतीतून सत्य स्पष्ट आहे की या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी ही धोक्याची घंटा आहे’, अशा अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.