खंदा मार्गदर्शक हरपला – उदय सामंत
. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे शिवसैनिक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांच्या निधनाने माझ्या वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या बांधणीत त्यांनी अतुलनीय योगदान दिलं. आज मी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वना भेट घेतली आणि आप्पांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.आप्पा साळवी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात शिवसेनेला नव्या उंचीवर नेलं. माझ्या सारख्या अनेक शिवसैनिकांचे ते मार्गदर्शक होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांचा सतत गौरव होत असे. त्यांच्या कार्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत पायाभरणी झाली आहे.आप्पा साळवी यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि नंतर जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आणि आमदार म्हणून यशस्वी वाटचाल केली. १९९५ साली शिवसेना-भाजप युतीच्या शासन काळात ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले आणि आपल्या कार्यकौशल्याने राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या निष्ठेने, प्रामाणिकतेने, आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी जिल्ह्यातील राजकारणात स्वतःची अढळ जागा निर्माण केली. अनेकांसाठी ते राजकीय गुरु आणि प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव आज प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि जनतेच्या हृदयात घर करून आहे. आप्पा साळवी यांनी निर्माण केलेला हा अमूल्य ठेवा सदैव प्रेरणा देणारा ठरेल.