
कोकणातील जांभ्या दगडातील कातळशिल्प, वारसा संशोधन केंद्राचे एक पाऊल पुढे
कोकणातील जांभ्या दगडातील कातळशिल्प, वारसा संशोधन केंद्राचे एक पाऊल पुढे पडले आहे. कातळ शिल्पांच्या ठिकाणी दगडी हत्यारे मिळाल्याने येथे प्राचीन मानवाचा वावर असल्याचे जणू पुरावेच आढळले आहेत. महाराष्ट्रातील पहिले वारसा संशोधन केंद्र रत्नागिरीत गेले वर्षभर कार्यरत असून त्याद्वारे संशोधनाला गती मिळाली आहे. वर्षभराच्या या केंद्रातर्फे ३० गावांचे डिजिटल डॉक्युमेंटशन झाले आहे. २६ गावांचे पुरातत्वीय सर्वेक्षण करण्यात आले. त्यावर विस्तृत काम सुरू असून या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला जोड देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सुधीर रिसबुड यांनी सांगितले.विज्ञान, तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकार यांच्या पुढाकारातून आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी मद्रास, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी संचलित, आयआयटी हैद्राबाद, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली यांच्या सहयोगाने कातळशिल्प संशोधनाचे काम चालू आहे. रत्नागिरी, राजापूर, मालवण या तीन तालुक्यातील कातळशिल्पांच्या ठिकाणी दगडी हत्यारांचे अवशेष सापडले आहेत. त्या आधारे प्राचीन मानवाचा तिथे वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अष्मयुगीन कालखंडातील म्हणजेच २० हजार वर्षापूर्वीची ती कला असावी असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे या कातळ शिल्पांच्या ठिकाणी व्यापक काम सुरू करण्यात आले आहे. संशोधन केंद्राद्वारे ३० गावातील कातळशिल्पांच्या ठिकाणी संस्कृती, वारसा सर्वेक्षण केले जात आहे. त्या ठिकाणच्या प्रथा, परंपरा, कलाप्रकार जाणून घेवून त्याचे संकलन केले जात आहे. ही संकलित केलेली माहिती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात मांडली जात असून त्याचे संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात येत आहेत. त्यामुळे कोकणातील कातळशिल्पाच्या अभ्यासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त होणार आहे.कोकणातील कातळशिल्पे सन १९९० पासून अनेक मंडळींनी उजेडात आणण्यास सुरूवात केली होती. सन २०१२ सालापासून रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई या त्रयींनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक गाव सडयांवरील कातळ शिल्प उघडकीस आणली. त्यांची संख्या २५०० पेक्षा अधिक झाली आहे. www.konkantoday.com