
मध्य रेल्वेनं हमालांसाठी प्रतीक्षा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वे स्थानकांवर हमाल बांधवांना जास्त वेळ थांबवून ठेवणं आता महागात पडणार आहे. मध्य रेल्वेनं हमालांसाठी प्रतीक्षा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मध्य रेल्वेच्या नव्या दरपत्रकानुसार, आता हमाल बांधवांना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबवल्यानंतर प्रतीक्षा शुक्ल आकारण्यात येईल. आधी 40 किलो लगेज डोक्यावर घेऊन जाण्यासाठी 50 रुपये हमाली मोजली जात असे, आता 40 किलो ते 160 किलोपर्यंतच्या सामानासाठी 75 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत. चारचाकी बॅरो किंवा दुचाकीनं सामान वाहून नेण्यासाठी एका फेरीचे 80 रुपयांऐवजी प्रवाशांना 135 रुपये द्यावे लागणार आहेत.1 ते 4 श्रेणी एनएसजी स्थानकांवर 85 रुपये, मध्यम एसजी 1, एसजी 2, एसजी 3 मुंबई / पुणे विभाग आणि एसएनजी 5 श्रेणी स्थानकांवर 80 रुपये, लहान एचजी 1, एचजी 2, एचजी 3 आणि एसएनजी 6 श्रेणी स्थानकांवर 75 रुपये दर असून हे सर्व सुधारित दर मध्य रेल्वेच्या 110 रेल्वे स्थानकांवर लागू होतील. अर्ध्या तासानंतर प्रतीक्षाशुल्कदेखील आकारण्यात येईल. मात्र गाडी येईपर्यंत सुरूवातीच्या अर्ध्या तासात कोणतंही प्रतीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.दादर पूर्व ते पश्चिमेदरम्यान सामान वाहतुकीसाठी 85 रुपये, 2 ते 4 चाकांच्या बॅरोसाठी प्रतिफेरी (160 किलोपर्यंत) 135 रुपये तसंच आजारी किंवा दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचअरवरून नेण्यासाठी 135 (2 हमाल) / 205 (4 हमाल) रुपये असे दर असतील.