निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन!!
जम्मू आणि काश्मीरमध्या प्रथमच राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेखाली निवडणूक होत असून ती ऐतिहासिक असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० रद्द करतानाच जम्मू आणि काश्मीर राज्याचे द्विभाजन केले होते. त्यामुळे जम्मू व काश्मीर तसेच लडाख यांचे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती.*जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ आणि २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होत असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. शहा हे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्यासाठी जम्मूमध्ये होते. जम्मू उत्तर विधानसभा मतदारसंघातील पलौरा येथे बोलताना शहा यांनी शेवटच्या फेरीत मतदान होणाऱ्या ११ मतदारसंघांमधील पक्षाच्या उमेदवारांचा परिचय करून दिला. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील याची खबरदारी घ्या असे आवाहन त्यांनी केले. पुढील सरकार जम्मू भागातून ठरेल असे विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.ही निवडणूक भाजप दृढ निश्चयाने लढत असून आपल्या विजयाबद्दल कोणीही शंका बाळगू नये असे शहा यावेळी म्हणाले. आपल्या विरोधकांच्या अनामत रकमाही जप्त होतील असा दावा त्यांनी केला. जम्मू आणि काश्मीरमधील सरकार कोणाचे असेल हे अन्य कोणी ठरवायचे दिवस गेले आहेत. आता जम्मू विभागच याचा निर्णय घेईल असे शहा म्हणाले. जम्मू भागातील जनतेला भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागत होता असा आरोप शहा यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी तो दूर करून तुमचा सन्मान दूर केला आहे असे ते म्हणाले. तुमच्यासाठी काम करणारे सरकार निवडा. तुमच्या कामासाठी तुम्हाला भिकेचा वाडगा घेऊन श्रीनगरला जावे लागणार नाही याची खबरदारी घ्या अशी तिखट टीका शहा यांनी केली. गेल्या १० वर्षांच्या काळात मोदींच्या राजवटीत एकट्या जम्मू भागाच्या विकासासाठी ३५ हजार कोटी खर्च केले असल्याचा दावा करत त्यांनी विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी विभाजन करण्याच्या विचारांची आहे या आरोपाचा पुनरुच्चार शहा यांनी केला.