गेली २० वर्ष अविरतपणे सुरू असलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार
पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात झी मराठीवरीलही एका मालिकेचा समावेश आहे. आता या मालिकेसाठी जुन्या मालिकेला निरोप घ्यावा लागणार होता मात्र झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी आहे.गेली २० वर्ष अविरतपणे सुरू असलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २० वर्ष सुरू असलेला हा कार्यक्रम अचानक बंद का केला जातोय याबद्दल कोणतंही कारण सांगण्यात आलेलं नसलं तरी आदेश जड अंतकरणाने सगळ्यांचा निरोप घेत आहेत. हा कार्यक्रम काही काळासाठी अल्पविराम घेत असल्याचं सांगण्यात येतंय.’दार उघड बये’ असं म्हणत लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर हे घराघरातील गृहिणींची सुखदुःखं वाटून घेत होते. त्यांच्या संवाद कौशल्यामुळे घराघरातल्या स्त्रिया त्यांच्या दुःखालाही वाट करून देत. प्रसंगी त्या कॅमेरासमोर रडतदेखील. या कार्यक्रमामुळे अनेक दुरावलेली नाती नव्याने जुळली. अनेक वर्षांपासून न भेटलेले नातेवाईक भेटले. रोजच्या जीवनातून गृहिणींना थोडासा विसावा या कार्यक्रमाने दिला. मात्र आता हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, ‘२० वर्षं आनंदाची होती. झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून २० वर्षांत साधारण ६५०० भाग, अंदाजे ६ लाख २२५० कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला. विविध कार्यक्रमांमधून ६० लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि माऊलींना भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होते आणि अजूनही अनेक कुटुंब ‘होम मिनिस्टरची’ वाट बघत आहेत. २० वर्षांच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची. तेव्हा आज्ञा असावी.’कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा येत्या काही दिवसांत प्रक्षेपित होणार आहे. २०व्या वर्षपूर्तीनिमित्त गणपती विशेष भाग चित्रित करण्यात येणार आहे. ‘उत्सव बाप्पाचा, खेळ होम मिनिस्टरचा’ असं त्याचं शीर्षक असणार आहे. मात्र त्यानंतर हा कार्यक्रम सगळ्यांचा निरोप घेणारा आहे.