ऐन गणेशत्सवात प्रशासन आणि विक्रेते आमने सामने, मिरकरवाडा बंदरावरील मच्छी विक्रेत्या महिलांना नोटीस.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरावर नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यावर मच्छी विक्रेता महिला दुतर्फा बसून मच्छी विक्री करतात. त्यासंदर्भात मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाने नोटीस बजावूनही काहीही परिणाम झालेला नाही. आता मच्छिमार सहकारी संस्थांकडून प्राधिकरणाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे प्राधिकरणाकडून कारवाईचे नियोजन केले जात आहे. यापूर्वी या मच्छी विक्रेता महिलांची मासळी जप्त करण्याची कारवाई झाली आहे.मिरकरवाडा बंदरावरील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्याचबरोबर मच्छी विक्रेता महिलांना व्यवसाय करण्यासाठी याठिकाणी मासेमारी विकास अंतर्गत नवीन मच्छिमार्केट बांधण्यात आले आहे. हे मच्छिमार्केट तब्बल 50 मीटर लांब आणि 19.50 मीटर रुंदीचे आहे. तरीही या महिला या मार्केट बाहेरच्या नव्याने काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर दुतर्फा बसून मासळी विक्री करतात. त्यामुळे येथे ग्राहकांसह त्यांच्या वाहनांची गर्दी असते. याठिकाणी मच्छिमार संस्थांचे डिझेल पंप आहेत. त्यांचे डिझेल टँकर याच रस्त्यावरून येत-जात असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे.मच्छिमार नौकांचे इंधन घेवून जाण्यासाठी बॅरल घेवून येणार्या छोट्या टेम्पोंनाही येथून येणे-जाणे धोकादायक बनले आहे. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणने संबंधीत मच्छी विक्रेता महिलांना येथील मार्गावर मच्छी विक्री न करता नवीन मार्केटमध्ये व्यवसाय न केल्यास कारवाई करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. परंतु या महिलांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.